गडचिरोलीत अवैध सावकारीचा विळखा; आझाद समाज पक्षाची कठोर कारवाईची मागणी

गडचिरोली, ३१ मे: गडचिरोली जिल्ह्यात अवैध सावकारीने गरजू नागरिकांचे शोषण वाढले आहे. बचत गट, परवानाधारक सावकार, व्यापारी आणि खाजगी व्यक्तींकडून नियमबाह्य पद्धतीने २ ते १० टक्के मासिक व्याज (वार्षिक २४ ते १२० टक्के) आकारले जात आहे. यामुळे सामान्य माणसाची आर्थिक लूट होत असून, आझाद समाज पक्षाने याविरोधात तीव्र आक्षेप घेत कठोर कारवाईची मागणी केली आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी जिल्हा उपनिबंधकांना निवेदन सादर करून अवैध सावकारीविरुद्ध मोहीम राबवण्याची मागणी केली आहे.
बन्सोड यांनी निवेदनात नमूद केले की, सावकार गरजूंच्या अडचणींचा गैरफायदा घेऊन बेकायदेशीर कर्ज देतात. कर्जदाराच्या मालमत्तेचे नोटरी करार किंवा गहाणखत करून घेतले जाते आणि व्याज वसुलीसाठी फोन किंवा प्रत्यक्ष भेटींद्वारे मानसिक दबाव टाकला जातो. काही प्रकरणांत मालमत्तेचा ताबा घेण्याचाही प्रयत्न होतो. नियमाप्रमाणे वार्षिक १८ टक्क्यांपेक्षा जास्त व्याज आकारणे बेकायदेशीर आहे, तरीही हा गंभीर प्रकार बिनदिक्कत सुरू आहे.
आझाद समाज पक्षाने मागणी केली आहे की, सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयाने तातडीने मोहीम राबवावी, तक्रारी मागवाव्यात आणि दोषींविरुद्ध गुन्हे नोंदवावेत. यामुळे जिल्ह्यातील अवैध सावकारीला आळा बसेल आणि पीडितांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा पक्षाने व्यक्त केली आहे.